शुक्रवार, 25 फ़रवरी 2011

माझ्या मनातील सुंदर शाळा

                           माझ्या मनातील सुंदर जिल्हा परिषद शाळा विजयनगर
                माझ्या मनातील शाळा सुंदर असावी असे मला वाटते.शाळेच्या चारही बाजूला पक्की भिंत असावी. शाळा प्रदूषण मुक्त असावी.त्या शाळेमध्ये विविध विषयांसाठी वेगवेगळ्या प्रयोगशाळा असाव्यात.शाळेच्या पुढे मोठे मैदान खेळायला असले पाहिजे. मैदानावर खो-खो, कबड्डी व इतर खेळ घेणारे शिक्षक असावेत. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना विविध खेळांचे प्रशिक्षणही देण्यात यावे.शाळेच्या बाजूला बाग असावी. त्या बागेत वेगवेगळ्या प्रकारची झाडे व फुलझाडे असावीत. शाळेला निसर्ग रम्य वातावरण असावे.
           शाळा गावाच्या एका बाजूला असावी व तेथे गोंगाट नसावा. त्या शाळेचे लक्ष्य विद्यार्थ्यांना आदर्श शिक्षक घडविणे ,व आदर्श नागरिक घडविणे , हे असावे. शाळेत स्वच्च पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी.शाळेत मुलामुलींसाठी स्वतंत्र स्वच्चातागृह असावे.सर्व मुलामुलींना शाळेत दुपारचे जेवण दिले जावे.शाळेत मुलांसाठी व शिक्षकांसाठी ग्रंथालय असले पाहिजे.शाळेच्या ग्रंथालयातील कपाटांना कुलपे नसावीत,म्हणजे ज्याला हवे ते पुस्तक त्याने काढावे नि वाचायला लागावे.शाळेतील सर्वांना संगणकाची माहिती होण्यासाठी संगणक पुरेश्या प्रमाणात असले पाहिजे.शाळेत स्वतंत्र दिन ,प्रजासत्ताक दिन ,थोर व्यक्ती व नेत्यांच्या जयंत्या व पुण्यतिथ्या साजरा करण्यात याव्या.स्वातंत्र्याचे महत्त्व काय हे मुलांमध्ये ठसविले जावे.म्हणजे विद्यार्थ्यांना वाटेल कि,आपण भारतासाठी काहीतरी केले पाहिजे.पुढील काळात देशाची जबाबदारी आपल्यावर आहे.असे पटवून देणारी शाळा असावी.
                शाळेतील वर्ग मोठे असावे.वर्ग हवेशीर असेल ,भरपूर प्रकाश असावा .वर्गात मुलांना बसायला चांगली बैठक व्यवस्था असावी .माझ्या शाळेतील अभ्यासक्रम निश्चित असेल ,पण तो पूर्ण करण्याची रटाळ धडपड नसेल.विद्यार्थी स्वतः अभ्यास करतील,वाचन करतील,त्यात त्यांना काही अडचणी आल्या तर शिक्षक मार्गदर्शन करतील.त्यामुळे विद्यार्थी परीक्षार्थी राहणार नाहीत .आजच्या शाळा केवळ परीक्षा घेण्यासाठीच आहेत,असे वाटते .पण माझ्या मनातील सुंदर शाळेत अशा परीक्षा हद्दपार होतील.विद्यार्थ्याने केलेल्या स्वयं -अध्ययनाचे शिक्षक वेळोवेळी परीक्षण करतील आणि त्यांना मार्ग दाखवतील.
            माझी शाळा अद्ययावत असेल.सर्व विद्यार्थ्यांना समजावून सांगणारे व छान अभ्यास करून घेणारे शिक्षक असावेत. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करून देणारी शाळा असावी .त्या शाळेमध्ये टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू कशा कराव्यात ,या बद्दल विद्यार्थ्यांना जागरूक करावे.एकंदरीत सर्व विद्यार्थी पर्यावरणाचे मित्र होतील,यासाठी ठोस प्रयत्न  व्हावेत .अशी असावी माझ्या मनातील सुंदर शाळा !
                                                                                                      दिलवरसिंग वसावे
                                                                               मुख्याध्यापक जि. प. शाळा विजयनगर
                                                                                             ता. साक्री जि . धुळे